मुंबई (दि.19 ऑगस्ट) :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. परब म्हणाले, उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्प्याटप्प्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही. प्रवासात प्रवाशांनी कोविड – १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
दि.२३ मार्चपासून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे.
दि.२२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवासी सेवा एसटीने पुरविली आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड – १९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.परब यांनी यावेळी केले.