चंद्रपूर महानगर पालिका अभियंता चैतन्य चोरेवर कारवाई करा - फ्रेंड्स चैरिटी ग्रुप तर्फे मनपा आयुक्तांना निवेदन, पत्रकारांशी अरेरावी करणारे महिलांशीही अरेरावी करतील - सरिता मालू cmc

चंद्रपूर महानगर पालिका अभियंता चैतन्य चोरेवर कारवाई करा - फ्रेंड्स चैरिटी ग्रुप तर्फे मनपा आयुक्तांना निवेदन

पत्रकारांशी अरेरावी करणारे महिलांशीही अरेरावी करतील - सरिता मालू
   
चंद्रपूर, 29 सेप्टेंबर (का प्र): मास्क लावण्याबाबत चंद्रपूर मनपा तर्फे सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत दरम्यान विनाकारण सामान्य नागरिकांना तसेच पत्रकार व इतर व्यावसायिकांना त्रास देत असलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी फ्रेंड्स चॅरिटी गृप तर्फे एका निवेदनातून मनपा आयुक्त राजेश मोहिते ह्यांना केली आहे. 

काही दिवसांपूर्वी अभियंता चैतन्य चोरे ह्यांनी मोहिमे दरम्यान एका वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन त्या दैनिकाच्या जिल्हा प्रतिनिधींना दंड करून त्यांच्याशी अरेरावी केल्याच्या बातम्या ऑनलाईन पोर्टल तसेच काही वृत्तपत्रांत प्रकाशित झाल्या होत्या त्यानुसार मनपाचे अभियंता श्री. चैतन्य चोरे ह्यांनी केलेली कृती निंदनीय आहे असे निवेदनात म्हंटले आहे. 

मा. जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या निर्देशांचे योग्य ते पालन होणे आवश्यक आहे हे आमच्या संस्थेचे प्रामाणिक मत आहे परंतु त्यासाठी आपल्या मनपाने सुरु केलेल्या पद्धतीने हे साध्य करणे सर्वसामान्य नागरिकांच्या मानवाधिकाराचे हनन करणारे ठरू नये ह्याची दक्षता घेणे अनिवार्य असुन झालेल्या प्रकाराची आम्ही तीव्र शब्दात निंदा करतो असे संस्थेच्या अध्यक्षा सरिता मालू ह्यांनी म्हंटले आहे. 

मनपाचे सर्व कर्मचारी हे जनसेवक असुन मालक नाही ह्याचे भान असणे आवश्यक आहे. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या आदेशात कुठल्याही कार्यालयात अथवा दुकान किंवा आस्थापनेत बळजबरीने प्रवेश करणे कायद्याने गुन्हा ठरते ह्याची जाणीव आपल्या अधिकार्‍यांना करून अशी मागणी करण्यात आली आहे. 

लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या पत्रकारांना जर अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल तर सामान्य जनतेचे काय होत असावे ह्याचा विचार करणे सुद्धा अंगावर काटा आणणारे आहे. जर असे उद्धट कर्मचारी कुणाच्याही घरात घुसून अशा प्रकारे कारवाई करत असतिल तर ते समाजाला घातक ठरणारे आहे.

बरेचदा घरात केवळ महिला असतात त्यांच्याशी जर असाच व्यवहार झाला तर मात्र महिलांना न्याय मिळावा म्हणुन आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करायला मागेपुढे पाहणार नाही त्यामुळे आपण अभियंता श्री. चैतन्य चोरे आणि इतर उद्धट कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तत्काळ उचित कारवाई करावी अशी जोरदार मागणी फ्रेंड्स चॅरिटी गृपच्या अध्यक्षा सरिता मालू ह्यांनी केली असुन ह्यावेळी  प्रगति पदेगेलवार ह्यांची उपस्थिती होती.