मुंबई 01 ऑक्टोबर : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठणार असल्याचे सूचक विधान पालकमंत्री विजय वडेट्टीवार यानी केलं आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी उठवण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. याबाबत नुकताच राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, चंद्रपूर चे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पोलीस महासंचालक आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारू बंदीबाबत अभ्यास करण्यासाठी दोन समित्या नेमण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या स्तरावर एक समिती राहील. ही समिती चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारूबंदी, अवैध दारू विक्री, महसुलात झालेली घट, दारू बंदी झाल्यावर जिल्ह्यातील गुन्हे यावर सर्व बाबीवर अहवाल देणार आहेत. ही समिती एक महिन्यात त्यांचा अहवाल देणार आहे. शासकीय आणि अशासकीय लोक या समितीत असणार आहेत. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर शासनाकडून एक समिती याचा अभ्यास करणार आहे. शासनाच्या समितीत आमदार, मंत्री, सचिव यांचा समावेश असणार आहे.