चित्रपटगृहे, योगा केंद्रे, आंतर मैदानी खेळ जलतरण तलाव, सुरु करण्यास परवानगी
चंद्रपूर, दि. 7 नोव्हेंबर : मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अधिसुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 5 नोव्हेंबर पासून निर्बंध शिथील करणे व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविणे अंतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
सुधारित सूचनांनुसार प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावाकरीता स्विमिंग पुल्स सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग, सर्व इनडोअर खेळाअंतर्गत बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सामाजिक अंतर राखून मुभा देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.
सिनेमाघर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह सुरू करण्यास एकूण क्षमतेच्या 50 टक्के बैठक व्यवस्थेच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. परंतु या सर्व ठीकाणी कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना विकण्याची किंवा घेवून जाण्याची परवानगी राहणार नाही. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील.
मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याकरीता यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना तशाच लागू राहतील व मुख्य सचिव यांच्या आदेशानुसार उपरोक्त मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशत: बदल करण्यात आला असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. सदर आदेश चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता उर्वरित ग्रामीण व शहरी क्षेत्रास दिनांक 30 नोव्हेंबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या किंवा टाळाटाळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचेवर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमुद केले आहे.