कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार : कांग्रेस जिलाध्यक्ष (शहर) रामु तिवारी
चंद्रपूर : भ्रष्टाचारमुक्ती, पारदर्शकतेचा आव आणत चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजप पदाधिका-यांनी आता आपले खरे रूप दाखविणे सुरू केले आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून मर्जीतल्या कंत्राटदारांना काम देण्याचा त्यांनी जणू सपाटा लावला आहे. असाच प्रकार कचरा संकलनाच्या कामात झालेला आहे.
कचरा संकलनाच्या कामासाठी आधी निविदा मागितल्या. त्यातील मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराला कमी रकमेचे दर असल्याने काम दिले. नंतर काहीतरी कारण सांगून संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली. पुन्हा त्याच कामासाठी ई.निविदा मागितल्या. आधी कंत्राट मंजूर केलेल्या स्वयंभू याच कंत्राटदाराला पुन्हा काम दिले. आधी हेच काम १७०० रुपये प्रति टन होते. तर, दुस.या निविदेत आता २५५२ रुपये झाले आहे. यातून या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी. अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहरातील घर ते धर कचरा गोळा करणे, कंपोस्ट डेपोपर्यंत कचरा वाहतूक करणे, नाली सफाईचा कचरा वाहतूक करणे या कामासाठी निविदा मागितल्या होत्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदारासह अन्य पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील दोन निविदा या तांत्रिक मूल्यांकनात पात्रता गुणांची पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार निविदांत मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराचा १७०० रुपये प्रति मेट्रीक टन हा सर्वात कमी दर होता. त्यामुळे या कंत्राटदाराला दहा वर्षासाठी काम देण्याच्या संपूर्ण खर्चास प्रशासकीय मंजूरी देण्याकरिता स्थायी समितीत निर्णय घेण्याकरिता आयुक्तांनी विषय सादर केला होता. त्यानुसार या संस्थेला काम मंजूर करण्यात आले.
मात्र, नंतर ही सर्व प्रक्रियाच रद्द करण्यात आली. मनपा प्रशासनाने या कामासाठी पन्हा ई.निविदा मागितल्या. यावेळी हे काम ७ वर्षे आणि वाढीव ३ वर्षे असे एकूण दहा वर्षांकरिता देण्यात येणार असल्याचा बदल केला. आधी काम मजूर झालेल्या मे.स्वयंभ ट्रान्सपोर्ट, पुणे या कंत्राटदारासह अन्य तीन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील एका कंत्राटदाराची निविदा ही तांत्रिक मूल्यांकनात पात्रता गुणांची पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आली. उर्वरित तीन निविदा उघडण्यात आल्या. त्यात में. स्वयंभू ट्रान्सपोर्ट, पुणे या संस्थेचा सर्वात कमी दर होता. मात्र, आधी मंजूर झालेल्या कंत्राटातील दरात तब्बल आठशे रुपयांनी वाढ करीत कंत्राटदाराने २५५२ एवढी रक्कम नमूद केली आहे. मनपा प्रशासनाने मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या संस्थेला सादर केलेल्या दरात वाटाघाटी करण्यासाठी ७ डिसेंबरला दुपारी १ वाजता मनपात उपस्थित राहण्यास कळविले. मात्र, या संस्थेने मनपात उपस्थित न राहता निविदेत सादर केलेला दर हा बाजारभावाशी सुसंगत आहे. त्यानुसार काम करण्यास तयार असून, काम करण्याची संधी देण्याची विनंती केली.
संबंधित कंत्राटदाराची विनंती मनपातील भाजप पदाधिकाऱ्यांनी तातडीने मंजूर करीत ७ वर्षे कालावधी व ३ वर्षे वाढीव अशा एकूण दहा वर्षांकरिता येणाऱ्या संपूर्ण खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत ११ डिसेंबरला प्रशासकीय मान्यता देण्यात दिली आहे. यासर्व प्रकरणात मोठे अर्थकारण दडल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्त्वात मनपात सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी कचरा संकलनात मोठा घोटाळा केला आहे. यातून भाजपचा पारदर्शकतेचा फुगा पूर्णपणे फुटला आहे. यासर्व घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विभागीय आयुक्त नागपूर, नगरविकास मंत्रालय यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. कारवाई न झाल्यास शहर जिल्हा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल.पत्रकार परिषदेत शहर महिला कांग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेश अडूर, नगरसेवक प्रशांत दानव,ओबीसी सेलचे नरेंद्र बोबडे, स्थायी समिती सदस्य नगरसेवक नीलेश खोब्रागडे,माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार,अख्तर सिद्दीकी आदि उपस्थित होते.