प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण आवश्यक
मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये
बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर व अतिरिक्त मास्क ठेवावे
प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शरीराचे तापमान याबाबतचे अभिलेख ठेवणे
वाहन चालक व वाहक यांची १५ दिवसांमध्ये एकदा आरटीपीसीआर चाचणी
नमुद आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूकीस मनाई
चंद्रपूर, दि. 26 फेब्रुवारी : चंद्रपूर जिल्ह्यात व लगतच्या यवतमाळ, वर्धा, नागपूर व अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने खाजगी बस वाहतुकदार, टॅक्सी व ऑटोरिक्षा संघटना यांच्यासाठी आंतरजिल्हा व जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी मानक कार्यपद्धतीचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.
या मानक कार्यपद्धतीनुसार खाजगी प्रवासी बस ऑपरेटर व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी कोव्हीड-19 महामारी च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे. मोटार वाहन नियमातील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने प्रवासाच्या प्रत्येक दिवशी/प्रत्येक फेरीअंती प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष/कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी.
एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी-खोकला इ. प्रकारची कोव्हीड १९ आजाराची लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा व याबाबत तात्काळ शासकिय यंत्रणेला रुग्णाची माहिती कळविण्यात यावी. चालकाने प्रवासादरम्यान जेवण /अल्पोपहार/प्रसाधनगृहाचा वापर याकरीता बस थांब्यावरील ठिकाणे स्वच्छ असल्याची खातरजमा करावी. बसमध्ये चढताना/उतरताना तसेच प्रवासादरम्यान खानपानाकरीता व प्रसाधनगृहाच्या वापराकरीता बस थांबविली असताना प्रवाशांनी एकमेकांशी सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घेण्याबाबत प्रवाशांना सुचना देण्यात याव्यात. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये, कचऱ्यासाठी कचराकुंडीची वापर करण्याच्या व बसमध्ये स्वच्छता राखण्याच्या सुचना देण्यात याव्यात.
प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करणे तसेच प्रत्येक फेरीतील प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, शरीराचे तापमान याबाबतचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल. बसचे वाहन चालक व वाहक यांची आरटीपीसीआर चाचणी १५ दिवसांमध्ये किमान एकदा करुन परिवहन व पोलीस विभागाचे तपासणी अधिकारी यांना मागणी केल्यानंतर दाखविण्यात यावे.
ऑटोरिक्षा/टॅक्सी/पर्यटक कॅब यांकरीता मानक कार्यपध्दती :-
मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना ऑटोरिक्षा/टॅक्सी/पर्यटक कॅब मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच वाहनामध्ये सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकिकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे.
ऑटोरिक्षा/टॅक्सी/पर्यटक कॅब मध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांपैकी एखादया प्रवाशास ताप, सर्दी-खोकला इ. प्रकारची कोव्हीड १९ आजाराची लक्षणे दिसत असल्यास, अशा प्रवाशांना वाहनातून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा व याबाबत तात्काळ शासकिय यंत्रणेला रुग्णाची माहिती कळविण्यात यावी. नमुद आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक वाहनातुन करण्यात येऊ नये.
उपरोक्त सुचनांचे पालन न केल्यास परवानाधारकांविरुध्द मोटार वाहन अधिनियम १९८८, केंद्रीय मोटार
वाहन नियम १९८९ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदिनुसार उचित कायदेशिर कारवाई करण्यात
येइल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.