नवरदेवासह बाप, भाऊ-भावजय पॉझिटिव्ह,
वऱ्हाडी क्वारन्टाईन!
जळगाव : महाराष्ट्र राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अशातच जळगाव तालुक्यातील एका लग्नाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नवरदेव, नवरदेवाचे वडिल, नवरदेवाचे भाऊ-भावजय यांना कोरोनाने गाठलं आहे.
जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह त्याचे वडील, भाऊ, भावजयी आणि अन्य एक जण असे पाच जण कोरोना बाधित निघाले आहेत. शिरसोली गावात दोन दिवसात सात बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
16 फेब्रुवारीला विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाने बाधित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. तसंच संशयित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
या लग्नातील नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्याने अख्ख्या वऱ्हाडीची चिंता वाढली आहे. आपण तर कोरोना पॉझिटिव्ह येत नाही ना? अशी भीती लग्नाला आलेल्या प्रत्येकाला वाटू लागली आहे. या लग्न समारंभातील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तसंच संशयितांना रुग्णालयात दाखल केल्याने प्रशासनाला धडकी भरली आहे.