मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीकास्त्र डागलं
संजय राठोडंच्या राजीनाम्यासह मुख्यमंत्र्यांची
अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्ष भाजपवर सडकून टीकास्त्र डागलं. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्या राजीनाम्यासह अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोरोना नियंत्रण अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपसारखा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने पाहिलेला नाही, असाही टोला लगावला.
1. “न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसा होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिलाय.”
2. “प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले. गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ.”
3. “तपास व्यवस्थित होऊ द्या. तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती. ज्या पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत आहात. तुमच्या काळातही त्यांनीच तपास केला होता. मग आता अविश्वास कसा दाखवता? पोलीस हा सरकारचा कणा असतो, अशावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे.”
4. पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी स्वतः पत्र लिहून महाराष्ट्र सरकारवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी तपास करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. तसेच कुटुंबाची बदनामी केलीय.
5. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांच्या खात्याचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे.
6. मुंबईत एका 7 वेळा खासदार असलेल्या नेत्याने आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपच्या नेत्यांची नावं निघाली तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी का करत नाही? ते केंद्र शासित प्रदेशातील आहेत. मुंबई पोलीस तपास करणार आहेत, मात्र केंद्राने मुंबई पोलीस तेथे तपासासाठी आल्यावर सहकार्य करावं. सुसाईड नोटमधील नावं तपासानंतर पुढे येतील.
7. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. आपल्याला कल्पना आहे की गेल्या वर्षी यावेळीच कोव्हिडने राज्यात प्रवेश केला. त्यानंतर एक वर्ष कसं गेलं हे आपण अनुभवलं. अजुनही कोरोनाचा धोका गेला नाही किंबहुना तो वाढतोय. सरकार प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. पहिला अनुभव लक्षात घेतल्यानंतर दुसरी लाट थोपवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. कुठेही काही कमी पडू द्यायचं नाही अशी सरकारची जिद्द आहे.
8. अजितदादा 8 मार्चला अर्थसंकल्प सादर करतील. अजूनही केंद्राकडून 29 हजार कोटी रुपयांचा जीएसटी परतावा येणं बाकी आहे. केंद्र सरकार इंधनावर कर लावून राज्याला ओरबाडत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही प्रचंड कर लावला जातोय.
9. सावरकरांबाबत जे बोलले त्यांनी आधी जयंती की पुण्यतिथी याबाबत अभ्यास करावा.
10. सीमा प्रश्नाबाबत त्यांनी म्हटलं की आम्ही एकत्र आहोत. मग केंद्रात आणि कर्नाटकात तुम्ही आहात. गेली पाच वर्षे तुम्हीच होता. मग प्रश्न का सोडवला नाही. आज सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आक्रमक आहे. केंद्रात, कर्नाटकात तुमचं सरकार आहे. इथं आमचं सरकार आहे. तर मग आपण एकत्र आलो तर प्रश्न सुटू शकतो.