रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये
सिनेमागृहे, हॉटेल्स, उपहारगृहे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद
सर्व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने तर अत्यावक्षक सेवा पुर्ण क्षमतेने सुरू
प्रत्येक आस्थापनेत मास्कशिवाय प्रवेश राहणार नाही
आदेशाचे उल्लघंन करणारी आस्थापने/कंपन्या कोविड महामारी सुरू असेपर्यंत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल.
चंद्रपूर, दि. 30 मार्च : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावानुसार घोषित करण्यात आलेले लॉकडाऊन टप्पेनिहाय समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्याकरिता ‘मिशन बिगीन अगेन’ बाबत वेळोवेळी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या आदेशांना राज्य शासनाच्या सूचनेनुसार 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सर्व संबंधीत प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नुकतेच दिले आहेत.
सुधारीत आदेशानुसार सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करतांना प्रत्येक व्यक्तिने मास्क घालणे बंधनकारक राहील. सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्थळी वाहतुकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे. शक्य तेथे घरूनच काम करण्याची सुविधा देण्यात यावी. त्याकरीता कार्यालये, दुकाने, औद्योगिक क्षेत्र, वाणिज्यिक आस्थापना यांनी त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित कराव्यात. सर्व प्रकारचे कार्यालये, दुकाने, आस्थापना यांनी कामाच्या ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीत पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, सर्व प्रकारची सार्वजनिक ठिकाणे उदा. उद्याने, बगिचे, पार्क आदी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. सर्व प्रकारची सिनेमागृहे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, प्रेक्षकगृहे व हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे हे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहतील. या कालावधीत हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे मार्फत पार्सल सुविधेस रात्री 11 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील. लग्न समारंभाकरीता 50 व्यक्ती व अंत्यविधीकरीता 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
गृह विलगीकरणातील रुग्ण पॉझेटिव्ह असल्याबाबतचा फलक त्याच्या घरासमोर ठळकपणे दिसेल, असा लावण्यात यावा. तसेच त्याचा 14 दिवसांचा गृह विलगीकरणाचा कालावधी त्यात नमुद करावा. कोरोना पॉझेटिव्ह रुग्णाच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारावा. कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांनी अत्यावश्यक गरजेशिवाय बाहेर फिरणे टाळावे. या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित रुग्णास तात्काळ कोव्हीड सेंटरमध्ये हलविण्यात येईल.
सर्व वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा पुर्ण क्षमतेने तर सर्व खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात संबंधीत कार्यालयप्रमुख कोविड शिष्टाचाराचे नियमांची पुर्ततेच्या अधिन राहून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतील. उत्पादन क्षेत्रातील कंपन्या पुर्ण क्षमतेने सुरू राहतील. तथापि कोविड नियमांची पुर्तता व सोशल डिस्टन्सचे पालन करणे त्यांना बंधनकारक राहील व यासाठी गरज पडल्यास त्यांनी कामगारांची उपस्थिती नियंत्रीत करावी. तसचे प्रत्येक आस्थापनेत मास्कशिवाय प्रवेश राहणार नाही व प्रवेशद्वारावर आगंतुकाचे तापमान मोजणे व हात स्वच्छ करण्याकरिता हॅण्ड सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक राहील.
आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या संबंधीत सिनेमागृहे, हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, मंगल कार्यालये व उत्पादन क्षेत्रातील कंपन्या कोविड महामारी सुरू असेपर्यंत बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. नियमाचे पालन न केल्यास प्रत्येक व्यक्तिला स्थानिक प्राधिकरणाने एक हजार रुपये दंड करावा. कोणत्याही व्यक्तिने मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच संबंधीतांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता, साथरोग कायदा व व इतर संबंधीत कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.