‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम , कोरोना प्रतिबंधासाठी लोकप्रतिनिधींद्वारे नागरिकांचे समुपदेशन आवश्यक -- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने Majhe karyshetra, majhi jababdari upkarm

‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
                            
कोरोना प्रतिबंधासाठी लोकप्रतिनिधींद्वारे नागरिकांचे समुपदेशन आवश्यक 
-- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि. 2 : जिल्ह्यात कोविडसंदर्भातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कोरोना नियंत्रणसाठी नागरिकांमध्ये समुपदेशनाद्वारे सजगता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची भुमिका महत्वाची असून त्यांनी ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. 

या उपक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महापौर कचर्लावार, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, महापालिका आयुक्त राजेश मोहिते, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज महानगरपालीका सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य,  पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचेशी नियोजन भवन सभागृहात संवाद साधला.
या उपक्रमाद्वारे नागरिकांनी स्वत:हून कोविडची तपासणी करुन घेणे, कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती देणे त्यासोबतच मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, वारंवार हात  धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, लग्न व इतर सामुहिक समारंभाच्या ठिकाणी नियंत्रित संख्या ठेवणे, कोरोनासंदर्भातील लक्षणे आढळताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आदी माहिती या उपक्रमाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनी जनतेपर्यंत पोहचविण्यात यावी असे सांगितले. 
कोविड लसीकरणाचा तिसरा टप्पा जिल्ह्यात कालपासून सुरू करण्यात आला आहे. यात 45 वर्षांवरील व्याधीग्रस्त व 60 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत असून ही लस घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना उद्युक्त करून नोंदणीसाठी आवश्यक सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, ब्रम्हपूरी, गोंडपीपरी, जीवती, कोरपना, मूल, नागभीड, पोंभूर्णा, राजूरा, सावली, सिंदेवाही, वरोरा, ब्रम्हपरी, चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर येथील ग्रामीण रूग्णालय, चंद्रपूर जिल्हा रूग्णालय, चंद्रपूर महानगरपालीकेअंतर्गत रामचंद्र हिंदी प्रायमरी शाळा, टागोर प्राथमिक शाळा, मातोश्री शाळा तुकुम, पोलीस रूग्णालय या वीस शासकीय केंद्रावर तसेच ब्रम्हपुरी येथील ख्रिस्तानंद कोवीड हॉस्पीटल, चंद्रपूर येथील संजीवनी हॉस्पीटल, क्राईस्ट हॉस्पीटल, बुक्कावार हार्ट ॲण्ड क्रीटीकल केअर हॉस्पीटल, वासाडे हॉस्पीटल, मुसळे चिल्ड्रन व मानवटकर हॉस्पीटल या सात खाजगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

  या अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, पोलीस विभाग, महानगरपालीकेचे व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, तालुका व नगरपालीका स्तरीय कोविड टिमचे इतर अधिकारी हे सहभागी होणार असून त्यांचेसोबत जिल्हाधिकारी गुल्हाने व संबंधीत अधिकारी हे विविध तालुक्याचे ठिकाणी  संवाद साधणार आहेत.