गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा
नवी दिल्ली : अवघे जग कोरोनाशी लढत असताना सध्या लसीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे. महाभयंकर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी लसीकरण हाच सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. याच अनुषंगाने लस उत्पादन करणारी सिरम इन्स्टिट्यूटला भारतासह संपूर्ण जगभर महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याच अनुषंगाने या कंपनीचे सीईओ अदार पुनावाला यांच्या जिवीताला धोकाही संभावत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. पुनावाला यांची सुरक्षा वाढवण्याबाबत गृह मंत्रालयाने आज निर्णय घेतला.
अदार पुनावाला हे देशात कुठेही गेले तरी त्यांच्या संरक्षणार्थ ‘वाय’ दर्जाचे सुरक्षा कवच तैनात असणार आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलिस बल म्हणजेच सीआरपीएफवर सोपवण्यात आली आहे. पुनावाला यांच्यासोबत 24 तास 11 जवान तैनात राहणार आहेत. पुनावाला यांची वाढती लोकप्रियता तसेच कोरोना लढ्यात कोविशिल्ड लसीला जगभरातून मिळत असलेला वाढता प्रतिसाद याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पुनावाला यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सिरम इन्स्टिट्यूटने अलिकडेच कोविशिल्ड लसीचे नवीन दर जाहीर केले. या दरवाढीवरून पुनावाला यांच्यावर काही प्रमाणात टीकाही झाली. हेही सुरक्षा वाढवण्यामागील एक कारण असू शकते, असे काही जाणकारांचे मत आहे.