- पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार
चंद्रपूर बेड मॅनेजमेंट पोर्टलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा
चंद्रपूर दि.1मे : कोरोनाचे हे संकट अधिक तीव्र आहे. त्यामुळे पुढचे नियोजन करताना ऑक्सिजन व मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.तसेच या संकटावर यशस्वीपणे मात करण्यासाठी नागरिकांनी संचारबंदीचे व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस दलाकडून देण्यात आलेली मानवंदना पालकमंत्र्यांनी स्विकारली.
कोरोना आजाराच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मर्यादित अधिकार्यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले,
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते,उपविभागीय अधिकारी रोहन घुगे,अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, प्रामुख्याने उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने झालेल्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात कोरोना उपाययोजनांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार म्हणाले की, कोरोना विरुद्धच्या लढ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका अविरत कार्य करत आहे त्यांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे.
कोविडचे संकट संवेदनशीलतेने हाताळताना मोठ्या प्रमाणात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 11 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, 19 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर 18 कोविड केअर सेंटर कोविडचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत आहे. 1400 बेडचे नियोजन पूर्ण झालेले असून त्यासोबतच, चंद्रपूर जिल्ह्यात 500 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल उभारण्यास मान्यता मिळाली आहे. रुग्णांना गावातच आयसोलेशन करता यावे या करिता आयसोलेशन सेंटर उभारणीसाठी तसेच रुग्णांच्या आरोग्य सोयी सुविधेसाठी 850 ग्रामपंचायतींना 1 कोटी 80 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
लवकरच महाराष्ट्र कोरोना मुक्त होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून कोरोनाच्या संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, वारंवार हात धुवा, मास्क लावा व सुरक्षित अंतर ठेवा. कोविड त्रिसुत्रीच्या आधारेच कोरोनावर मात करता येईल,असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात चंद्रपूर बेड मॅनेजमेंट पोर्टल या ॲपचे रीतसर उद्घाटन केले या माध्यमातून रुग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे.
वन अकादमी येथे 100 ऑक्सीजन बेड कार्यान्वित करण्यात येत आहे. त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व विहित वेळेत काम पूर्णत्वास नेण्याच्या सूचना पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी केल्या.
पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोवॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला. स्टाफ नर्स सावी मानकर यांनी लस टोचून दिली. तसेच नागरिकांनी लस टोचून घ्यावी, लस सुरक्षित व प्रभावी आहे. तसेच लस ही कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस टोचून घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.