मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. आज रविवारी 30 मे 2021 रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधतील. यावेळी ते कोरोना रुग्णसंख्या, लॉकडाऊन, कोरोना लसीकरणासह विविध विषयांवर चर्चा करणार आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे आज रविवार 30 मे 2021 रोजी रात्री 8.30 वाजता समाज माध्यमांवरून नागरिकांना संबोधित करतील, असे सांगितले आहे.
विषयांवर संवाद
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. यामुळे सरकार लॉकडाऊन उठवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. तर तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर उद्धव ठाकरे आज संवाद साधण्याची शक्यता आहे.
1 जूनपासून लॉकडाऊन उठवणार ?
दरम्यान या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार 1 जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.