सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही
भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद
नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. दौरा करणे ठीक आहे. परंतु, कोरोनाचा वाढता आलेख पाहता गरजेचे असेल तरच दौरा करावा. गाडीत किती लोकं बसणार आहे, लोकांमध्ये किती मिसळायचे याचा विचार करणे गरजेचे आहे. दौऱ्या करण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.
कोरोना परिस्थितीवर भाजप महानगर कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे, झेंडे लावले पाहिजे, याची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनाच माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, यात राजकारण करू नका अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
कोरोनाच्या या कठीण काळात पहिल्यापेक्षा धर्म, पंथ, पार्टी, पक्ष हे सर्व विसरून योग्य प्रकार मदत करणे, त्यांच्या मागे उभे राहून काम करावे लागणार आहे. भविष्यात नेतृत्वाला आणि पक्षाला याचे नक्कीच फळ मिळणार आहे. हे मागून मिळणार नाही. हे काम करून आपोआप याचे फळ मिळणार आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले. लोकांना राजकारण केले तर आवडणार नाही. तुम्ही जे काही चांगले काम केले, त्याचे क्रेडिट तुम्हाला आणि पक्षाला मिळणार आहे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
कार्यकर्त्यांचा जीव महत्त्वाचा कोरोनाच्या काळात अनेक कार्यकर्ते गमावले आहे. पक्षाची कामे जितका महत्त्वाची आहे तितकाच कार्यकर्त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. जीव राहील तर पुढे अनेक काम करता येईल. त्यामुळे हात जोडून विनंती आहे तुमची आणि कुटुंबाची काळजी घ्या. ज्यांनी लस घेतली नाही, त्यांनी लस घ्यावी, अशी विनंतीही गडकरी यांनी केली.