सायबर सेलची करडी नजर
नागपूर, दि 3 मे : नागपूर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कथित सूचनांचा संदर्भ घेऊन जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या नावाने एक चुकीचा संदेश व्हॉटसअप ग्रुप व अन्य समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही, अशा चुकीच्या, गैरसमज व भीती पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
नागपूर जिल्हाधिकारी यांच्या संदर्भ देऊन 'जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना ' या मथळयाखाली काही सूचनांचा संदेश व्हॉटसअपवर टाकण्यात आला आहे.तो जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाखाली प्रसारित करण्यात येत आहे. अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती नागपुर कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. राज्य शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या कोविड प्रोटोकॉल सूचनेशिवाय जिल्हा माहिती कार्यालयाकडून असे कोणतेही वृत्त प्रकाशित केले जात नाही. या वृत्ताचा जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंध नाही,असा खुलासा नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने कोविड काळात घ्यायची काळजी या संदर्भात यापूर्वी काढलेला आदेश स्वयंस्पष्ट आहे. जिल्हा प्रशासनाने वेगळे कोणतेही आदेश काढलेले नाही. नव्या कोणत्याही सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्याकडून देण्यात आल्या नाहीत. कोरोना संदर्भात शासन आणि प्रशासनाच्यावतीने राज्यस्तरावर दिल्या जाणा-या मार्गदर्शक सूचनाच प्रसारमाध्यम व नागरिकांपर्यंत अधिकृतरित्या जिल्हा माहिती कार्यालयाव्दारे प्रसारित करण्यात येतात, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, हे वृत्त कोणी प्रसारित केले याबाबत सायबर सेलकडे तपासणीसाठी देण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये भिती व गैरसमज पसरवणाऱ्या अन्य पोस्टवरही नजर ठेवण्याची सूचना सायबर सेलला केली आहे.