बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार, महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश #RajabhauSabhagruh

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार

महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश

चंद्रपूर, ता. २१ : बाबूपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह येत्या दोन दिवसांत सर्व जाती-धर्मासाठी खुले करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासिका तर नागरिकांना सभागृह उपलब्ध होईल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मगावात त्यांच्या स्मृतीत चंद्रपूर महानगर पालिकेने स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह बांधले. या सभागृहाचे लोकार्पण १७ जुलै २०१७ रोजी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते झाले. चंद्रपूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष ते राज्यसभेचे उपसभापती असा भव्य वारसा असणाऱ्या बॅ. खोब्रागडे यांच्या ज्ञान वर्धनाचा व समाज सेवेची महती सामान्य जनतेला कळावी, यासाठी तळमजल्यावर अभ्यासिका सुरु करण्यात आली. त्याचे लोकार्पण दि. २४ सप्टेंबर २०१७ रोजी झाले. यातून बाबूपेठ परिसरात विद्यार्थांना अभ्यासासाठी हक्काची जागा मिळाली होती. मात्र, मागील वर्षी आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सभागृह व अभ्यासिका बंद करण्यात आली होती.
 
या परिसरातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी याच सभागृहात केंद्र सुरु करण्यात आले. सध्या राज्य शासनाने निर्बंध उठवल्यामुळे सभागृह व अभ्यासिका खुले करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड (क्रमांक अ) चे नगरसेवक अनिल रामटेके, बाबूपेठ प्रभागाचे नगरसेवक स्नेहल रामटेके, नगरसेवक प्रदीप किरमे यांनी केली होती. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका आणि नागरिकांना काही कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह सुरु करण्याची सूचना महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केली. नागरिकांना कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह देताना कोरोना नियमांचे पालन करणे, शासनाने ठरवून दिलेले निर्बंध पाळणे बंधनकारक राहणार आहे. तसेच सभागृहात कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी झोनच्या सहायक आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील, असे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी सांगितले.