चंद्रपूर- केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक, माजी सैनिक ई.साठी देशात केंद्र सरकार मार्फत केंद्र सरकार आरोग्य योजना (CGHS) राबविली जाते. या योजनेचा लाभ लाखो केंद्र शासनाचे कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक, माजी सैनिक घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात तसेच लगतच्या गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ही या योजनेचा लाभ घेणारे हजारो केंद्रिय कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक, माजी सैनिक आहेत. या सर्वांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागपूर येथे जावे लागत होते. येथील नागरीकांची विशेषतः आयुध निर्माणी चांदा येथील निवृत्ती वेतन धारक, कर्मचारी, माजी सैनिक यांनी चंद्रपूर जिल्ह्यात CGHS केंद्र सुरु करण्याची मागणी हंसराज अहीर यांचेकडे केली होती. पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी खासदार असतांना सन 2013 पासून व नंतरही सदर केंद्र चंद्रपूर जिल्ह्यात सुरु करण्याबाबत वारंवार पत्राचार व तत्कालीन केंद्रिय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा जी, केंद्रिय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन जी यांचे सोबत प्रत्यक्ष भेट घेवून मागणी केलेली होती. केंद्रिय आरोग्य मंत्री हंर्ष वर्धन यांनी देशात 16 CGHS कल्याण केंद्र सुरु करण्यासाठी वित्त मंत्रालयाच्या मंजूरी चा प्रस्ताव केंद्रिय वित्त मंत्रालयाला पाठविला होता. या 16 केंद्रामध्ये चंद्रपूर चे नांव होते. अहीर यांनी लगेच केंद्रिय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी यांना चंद्रपूर येथील CGHS कल्याण केंद्रास वित्त मंत्रालयाने मंजूरी प्रदान करण्याची विनंती पत्राद्वारे केली होती.
हंसराज अहीर यांचे मागणीला यश आले असून चंद्रपूर जिल्ह्यात CGHS केंद्र सुरु करण्यास केंद्रिय आरोग्य व परीवार कल्याण मंत्रालयाने मंजूरी प्रदान केली आहेे. यामुळे जिल्ह्यातील, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील, गडचिरोली जिल्ह्यातील केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक, माजी सैनिक ई. ना सोयीचे होणार आहे. हंसराज अहीर यांनी केंद्रिय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन जी, केंद्रिय वित्त मंत्री निर्मला सीतारामन जी यांचे आभार मानले असून सदर केंद्र लवकरच नागरीकांच्या सेवेत सुरु होईल अशी आशा व्यक्त केली आहे.