Ø अधिका-यांना बांधावर जावून ‘शेतकरी संवाद’ करण्याच्या सुचना
Ø पालकमंत्र्यांकडून शेतक-यांची विचारपूस व बियाणांचे वाटप
Ø इतरही विषयांचा घेतला आढावा
चंद्रपूर,दि.4 जून : खरीप हंगामाला पुढील आठवड्यापासून सुरवात होत आहे. यावर्षी मान्सूनही चांगला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांना उच्च प्रतीचे बियाणे व खते वेळेवर मिळणे गरजेचे आहे. काही कंपन्या व वितरक नफेखोरी करण्याच्या दृष्टीने अव्वाच्या सव्वा भागात बियाणे व खतांची विक्री करून शेतक-यांची फसवणूक करतात. असे प्रकार निदर्शनास आले व उपलब्ध असलेला जुन्या खतांचा साठा नवीन दराने विकल्यास संबंधितांचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.
जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी उत्पादक कंपनी व कृषी निविष्ठा वितरकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डिले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे, गुणनियंत्रक अधिकारी प्रशांत मडावी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात धान, सोयाबीन व कापसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, जिल्ह्यात खतांचा जुना साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून तो जुन्या दरानेच विक्री झाला पाहिजे. नवीन दराने विक्री केल्यास संबंधितांचा परवाना रद्द करून गुन्हा नोंदविण्यात येईल. स्वत:च्या नफेखोरीसाठी शेतक-यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. तसेच बियाणे व खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होता कामा नये. जिल्ह्यासाठी कृषी निविष्ठांचा साठा पुरेसा असल्यामुळे कंपनी व वितरकांनी महिनानिहाय वाटप करावे. बियाणांची उगवण क्षमता कमी आढळली तर कंपन्यांना जबाबदार पकडले जाईल. त्यासाठी आतापासूनच कंपन्यांनी पर्यायी बियाणांची व्यवस्था करावी.
शेतक-यांना प्रमाणित बियाणांचे वाटप करणे गरजेचे आहे. अप्रामणित बियाणे विकून शेतक-यांची फसवणूक करू नका. कृषी निविष्ठा विकतांनाच शेतक-यांना मार्गदर्शक सुचनांचे पत्रक बॅगसोबत द्यावे. जेणेकरून शेतक-यांना पेरणीची योग्य वेळ, लागवण करतांना राखण्यात येणारे अंतर, आदी माहिती वेळेवर मिळेल व उत्पादकता वाढण्यास मदत होईल. धानाची खरेदी करणा-या संस्थांनी त्वरीत उचल करून गोदाम खाली करून द्यावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.
शेतक-यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांसह कृषी विभागाच्या अधिका-यांनी बांधावर जाऊन ‘शेतकरी संवाद’ करावा. शेतीच्या प्रत्यक्ष अनुभवाचा फायदा धोरण किंवा कार्यप्रणाली ठरवितांना उपयोगात येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील किमान एका गावात पुढील आठवड्यापासून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिका-यांनी बांधावर पोहचावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते बियाणांचे वाटप व शेतक-याची विचारपूस – यावेळी पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी शिवणीचोर येथील किसन देवाजी लोनगाडगे यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. तुमच्याकडे किती एकर शेती आहे, मागच्या वर्षीचा अनुभव काय, एका एकरमध्ये किती कापूस झाला, कोणते बियाणे वापरले, याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच यावेळी लोनगाडगे आणि नरसू किसन भोयर या शेतक-यांना प्राधिनिधिक स्वरुपात बियाणांचे वाटप करण्यात आले.
हिरापूर येथील टोलनाका जमीन अधिग्रहण आढावा : सावली तालुक्यातील हिरापूर येथील टोल नाक्यासाठी अधिग्रहीत करण्यात येणा-या जमिनीसंदर्भात पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. या टोलसाठी 5.24 हेक्टर खाजगी जमीन अधिग्रहीत करायची आहे. यवतमाळ तालुक्यातील वणी येथे दराबाबत जे सुत्र वापरले त्याच पध्दतीने चंद्रपूर जिल्ह्यातही दर आकारणी करून सुसूत्रता ठेवावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी खासदार सुरेश धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता श्री. मिश्रा आदी उपस्थित होते.
कोटगल बॅरेज प्रकल्पांतर्गत आढावा : कोटगल बॅरेज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील सहा गावांतील एकूण 137 हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता आहे. यात निफंद्रा, विहिरगाव, कसरगाव, चिखली, डोंगरगाव आणि बोरमाळा गावांचा समावेश आहे. सहाही गावांची संयुक्त मोजणी झाली असून निफंद्रा, विहिरगाव आणि कसरगाव या गावांचे मुल्यमापनसुध्दा झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
जबरान धारकांच्या समस्येबाबत आढावा बैठक : सिंदेवाही, मूल आणि चिमूर तालुक्यातील जबरान धारकांच्या समस्येबाबत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मु.का.अ. राहूल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, ताडोबा-अंधारी व्याघ्र् प्रकल्पाचे उपसंचालक श्री. गुरुप्रसाद, क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, आदिवासींनीच जंगल राखले आहे. त्यामुळे त्यांना पट्टे देण्यासाठी सकारात्मक निर्णय प्रक्रिया राबवावी. पट्ट्यांची कार्यवाही प्रगतीत असल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळेल, असे प्रशासनाने नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी सिंदेवाही कृषी संशोधन केंद्र प्रक्षेत्र विकास प्रकल्पाच्या मंजूरीबाबतही आढावा घेतला. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.