ताडोबा राष्ट्रीय उद्यानात वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक
चंद्रपुर तसेच सिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांची जमीन संपादित करणे गरजेचे
मुंबई, दि. ७ जून : ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये वन्य प्राण्यांकरिता कोअर क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी संबंधित चंद्रपूर आणि सिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांच्या पुनर्वसनासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आज मंत्रालयात ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील कोअर क्षेत्र वाढविण्यासंदर्भातील आणि आरे वन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (कांदळवन) वीरेंद्र तिवारी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचे वन संरक्षक मल्लिकार्जुन, कांदळवनचे उपवनसंरक्षक निनु सोमराज आदी उपस्थित होते. तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक श्री जितेंद्र रामगावकर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, वन्यप्राण्यांच्या संचारासाठी ताडोबा वनक्षेत्रात कोअर क्षेत्र वाढविणे गरजेचे असून, त्यासाठी चंद्रपुर तसेच सिंदेवाही तालुक्यातील नऊ गावांची जमीन संपादित करणे गरजेचे आहे. संबंधित गावातील निवासीयांचे पुनर्वसन आणि सर्व मुलभुत सुविधा यांचा आढावा घेऊन याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, आरे वनक्षेत्र संदर्भात कलम (4) घोषित करण्यात आलेले क्षेत्र दुग्ध विकास विभाग यांच्याकडून ताब्यात घेण्यात यावे. याचबरोबर भुमी अभिलेख विभागाकडून या क्षेत्राचे पुढील दीड महिन्यात सिमांकन करण्यात यावे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.