तक्रारीची दखल न घेणे भोवणार : पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची माहिती
चंद्रपूर : बाबुपेठ येथील अल्पवयीन मुलीने विवाहित व्यक्तीकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी त्या तक्रारीची गंभीरतेने दाखल घेतली नाही. पुढे संबंधित व्यक्तीने चाकू हल्ला केला. यात मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधीत पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी दिली.
बाबुपेठ येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची मंगळवारी (ता. २१) सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार बोलत होते. अल्पवयीन मुलीवर चाकू हल्ला करून ठार करण्याची घटना जिल्ह्यासाठी धक्कादायक असून, मन हेलावणारी आहे. घरातील कमावत्या मुलीचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. त्यामुळे घरातील एका व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याचे आधीच आदेश देण्यात आले आहेत. आरोपीला कडक शिक्षा व्हावी, आरोपी सुटत काम नये यासाठी आदेश दिले आहेत. पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल हे सांगण्यासाठी आज भेट घेण्यात आल्याची माहितीही विजयभाऊ वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.
यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष चित्राताई डांगे, अनुसूचित जाती विभागाच्या अश्विनीताई खोब्रागडे, माजी सभापती संतोष लहामगे, गोपाळ अमृतकर, कुणाल चहारे, राजेश अडूर, सचिन कत्याल, चंदाताई वैरागडे, राज यादव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.