खासदार बाळू धानोरकर यांनी कंपनी व्यवस्थापकांना दिले आदेश
#Loktantrakiawaaz
चंद्रपूर : गोपाणी स्पंज आयर्न (Gopani Iron) कामगारांचे दिनांक 6 ऑक्टोबर पासून अन्नत्याग आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया (Chandrapur Collector Office) समोर सुरू आहे. खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची विचारपूस करून कामगारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (Collector Ajay Gulhane) यांच्यासोबत कंपनी व्यवस्थापकासह बैठक घेऊन कामगाराच्या बाजूने निर्णय घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.
यावेळी गोपाणी स्पंज आयर्न (Gopani Iron & Power India Pvt. Ltd.) व्यवस्थापनाचे प्रतिनिधी उधोजी, कामगार नेते दिनेश चोखारे, कामगार प्रतिनिधी रमेश बुच्चे, संतोष बांदूरकर, मोहन वाघमारे, सदाशिव चतुर, रवी जोगी, महेश मोरे याची उपस्थिती होती.
मागील १७ वर्षापासून कार्यरत असलेल्या ५०० कामगारांना गोपाणी व्यवस्थापनाने कुठलीही पूर्वसूचना न देता, बेकायदेशीररीत्या कामावर काढून टाकले होते. कराराची मुदत संपून दीड वर्षे होत आहे. तो करार त्वरित करणे, पॉवर प्लॅन्ट चे १२० कामगार तात्काळ रुजू करणे व उर्वरित कामगारांना लवकरच रुजू करून घ्यावे व त्याबाबत लेखी करार करून तारीख सांगावी अशा अनेक महत्वाचा विषयावर चर्चा झाली. याबाबतचा सकारात्मक निर्णय सोमवारी होणार आहे.