चंद्रपुर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी 37 (1) व (3) चे कलम लागू
चंद्रपूर, दि. 14 डिसेंबर: चंद्रपूर, जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आला आहे. सदर आदेश दि. 15 डिसेंबरचे रात्री 12 वाजेपासून तर 31 डिसेंबर 2021 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)व(3) आदेश लागू करण्यात आले आहे.
(Sections 37 (1) and (3) apply to maintain peace and order in Chandrapur district)
या आदेशान्वये जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, जमा करून ठेवता येणार नाहीत किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा तयार करता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक किंवा जाहीरपणे असभ्य वर्तन करता येणार नाही.
या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांना मदत व्हावी तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व(3) लागू करण्यात आला आहे.
संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात सदर आदेश दि. 15 डिसेंबरचे ते 31 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.