इरई नदीचे सौंदर्यीकरण व जंगल सफारी उपक्रम त्वरीत पूर्ण करणार -पालकमंत्री विजय वडेट्टीवार, प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत इमारतींचे होणार बांधकाम Erie River beautification and jungle safari activities will be completed soon - Guardian Minister Vijay Wadettiwar, Republic Day flag hoisting program, Anganwadi, schools, Gram Panchayat buildings will be constructed

▶️ इरई नदीचे सौंदर्यीकरण व जंगल सफारी उपक्रम त्वरीत पूर्ण करणार -पालकमंत्री विजय वडेट्टीवार

▶️ प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

▶️ अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत इमारतींचे होणार बांधकाम

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 26 जानेवारी : चंद्रपूर हा नैसर्गिक साधन संपत्ती असलेला जिल्हा आहे. या नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग करून जिल्ह्याचा पायाभूत तसेच पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. साबरमती नदीच्या धर्तीवर इरई नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच टायगर सफारी प्रकल्पाला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. राज्याच्या निधीतून 77 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार असून चंद्रपूरात लवकरच टायगर सफारी सुरू होईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार बाळू धानोरकर,महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तसेच आदी अधिकारी उपस्थित होते.

ऐतिहासिक आणि वनभूमी असलेला हा जिल्हा आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा विकास करण्याला आपले प्राधान्य आहे. यात इरई नदीचे सौंदर्यीकरण, व्याघ्र सफारी यासोबतच पायाभूत सुविधा अंतर्गत रस्ते, जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा, अभ्यासिका, ग्रामपंचायत इमारतींचे सुसज्ज बांधकाम केले जाईल.
पुढे बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात रब्बी हंगामातील क्षेत्रात 43 हजार 440 हेक्टरने वाढ करण्यात आली आहे. करडई पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्रात 2463 हेक्टर वाढ झाली आहे. जिल्ह्यात कृषी, महसूल, ग्रामविकास, शिक्षण, वन विभाग व इतर सेवाभावी संस्थांच्या मदतीने लोकसहभागातून 3510 वनराई बंधारे बांधले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2020-21 या वर्षात 4442 घरकूल पूर्ण झाली आहेत. तर प्रपत्र ‘ड’ मध्ये या आर्थिक वर्षात 10377 चे उद्दिष्ट प्राप्त झाले असून मंजूरीची प्रक्रिया सुरू आहे. रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत 9286 घरे तर शबरी आवास योजना ग्रामीण अंतर्गत 3654 घरकुल बांधण्यात आले.  जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2106 वीज ग्राहकांना पारंपारिक पध्दतीने तर 1433 शेतक-यांना सौर कृषी पंपाद्वारे नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

महिला व बालकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांना घरपोच आहार पुरविण्यात येत आहे. सन 2021-22 या वर्षात नवीन अंगणवाडी बांधकाम, इमारत दुरुस्ती व शौच्छालय बांधकामासाठी 8 कोटी तसेच जिल्ह्यातील 350 आदर्श / मॉडेल अंगणवाडी केंद्राकरीता 5 कोटींची तरतूद उपलब्ध केली आहे. ‘डायल-112’ प्रकल्पांतर्गत 40 महिंद्रा बोलेरो आणि 83 दुचाकी देण्यात आल्या आहेत. जिल्हा खनीज प्रतिष्ठामध्ये प्राप्त निधीतून एकूण 1488 कामांसाठी 284 कोटी 93 लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजूरी प्रदान करण्यात आली आहे.  सन 2021-22 मध्ये जिल्ह्यातील एकूण 70 धान खरेदी केंद्रावर 13 हजार 331  शेतक-यांकडून 3 लक्ष 75 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांसाठी 50 टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट स्कूलसाठी 9 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल. प्राथमिक शाळांच्या बांधकामासाठी  कोटी व दुरुस्तीसाठी 3 कोटी 50 लक्ष रुपयांची तरतूद आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अभ्यासिका महत्वाची असून प्रत्येक तालुक्यात अभ्यासिका उभारण्यासाठी 8 कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. ब्रम्हपूरी व सिंदेवाही येथील पंचायत समिती इमारत बांधकामाकरीता प्रत्येकी 14 कोटी याप्रमाणे 28 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले येत्या तीन वर्षात यासाठी 60 ते 70 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या 3 ते 4 प्रवेश गेटचे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नगर परिषद नगर पंचायत क्षेत्रात असलेल्या अतिक्रमण धारकांना घरकुलसाठी नागपूरच्या धर्तीवर 500 फूट जागा देण्याचे नियोजन आहे. शहरातील 13 झोपडपट्टीतील जवळपास 400 कुटुंबांना नझुलचे पट्टे देण्यात येईल. महाज्योतीच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी एक हजार तर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी दोन हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. जेईई / नीटची तयारी करणा-या 3 हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. ओबीसींच्या मुलांना कमर्शियल वैमानिकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत पालकमंत्री म्हणाले, शासन आणि प्रशासनाने तिस-या लाटेसंदर्भात जवळपास 25 हजार रुग्णांसाठी प्रशासनाची तयारी आहे. यासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत सीसीसी, डीसीएससी, डीसीएच ची एकूण संख्या 8 आहे. तसेच 648 हायड्रोजन काँन्सेंस्ट्रेटर आणि 1705 ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध आहे. 90 मेट्रीक टन ऑक्सीजनचे नियोज करण्यात आले आहे. जिल्ह्यात पहिला डोज घेणा-यांची संख्या 95 टक्के तर दुसरा डोज घेणा-यांची संख्या जवळपास 70 टक्क आहे. 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण सुरू झाले आहे. कोरोनाच्य महामारीत सुरवातीपासून लढा देणारे जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, उद्योजक आणि या लढ्यात सहभागी सर् नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रजासत्ताक दिनाप्रसंग जिल्हा सैनिक कार्यालयाकडु देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थ पडलेल्या वीर जवानांच्य वीरमाता, वीरपिता, वीरनारी यांचा जिल्हयाचे पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये वीरनारी श्रीमती वेंक्कमा गोपाल भिमनपल्लीवार, वीरनारी श्रीमती अरुणा सुनील रामटेके, वीरमाता श्रीमती पार्वती वसंतराव डाहुले व वीरपिता वसंतराव डाहुले, वीरमाता श्रीमती छाया बाळकृष्णा नवले व वीरपिता बाळकृष्ण नवले तसेच नायब सुभेदार शंकर गणपती मेगरे यांना शौर्यचक्र प्राप्त झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनालय,चंद्रपूर या कार्यालयामार्फत चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन-2021 प्रकाशनाचे अनावरण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
Chandrapur District
(Erie River beautification and jungle safari activities will be completed soon - Guardian Minister Vijay Wadettiwar, Republic Day flag hoisting program, Anganwadi, schools, Gram Panchayat buildings will be constructed)