जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन स्पर्धेतील डॉक्टरांचे यश चंद्रपुर जिल्ह्याची मान अभिमानाने ऊंच करणारे : सुधीर मुनगंटीवार
यशवंत डॉक्टरांचा अभिनंदनपर सत्कार संपन्न
चंद्रपुर: आयुष्य जगत असताना अंतर्मनातील गोष्टी आपण निश्चीतपणे नोंदवित असल्यास, चिंतन करीत असल्यास यश निश्चीतपणे मिळत असते. चंद्रपूर हा जिल्हा कोळसा खाणींचा आहे. या खाणीतुनच आपण जगाला हिरे देत असतो याची प्रचिती शारिरीक आणि मानसिक चपळतेची कठीण परिक्षा समजली जाणारी जर्मनीतील ड्युसबर्ग येथे आयोजित आयर्नमॅन २०२२ स्पर्धेत चंद्रपूरच्या डॉक्टरांनी विजय पताका फडकावत दिली आहे. या डॉक्टरांचे हे यश चंद्रपुर जिल्ह्याची मान अभिमानाने ऊंच करणारे आहे , असे प्रतिपादन वने व सांस्कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी चन्द्रपुरातील आय.एम.ए. सभागृहामध्ये आयोजित सत्कार समारंभावेळी श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. अमल पोद्दार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, सचिव डॉ. नगीना नायडु, प्रोजेक्टर डायरेक्टर डॉ. रवि अल्लुरवार, कोषाध्यक्ष डॉ. अमित देवईकर, आय.एम.ए. वुमन विंग अध्यक्षा डॉ. कल्याणी दिक्षीत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, अर्जुनाला जसे केवळ पोपटाचा डोळा दिसत होता तसेच आपण आयुष्यामध्ये एकाग्रता ठेवून यश संपादन केले पाहीजे. जिद्द , निष्ठा , परिश्रम आणि चिकाटी यातून साकारलेले चिरंतन काळ टिकणारे असते असेही ते म्हणाले.
जर्मनीतील ड्युसबर्ग आयर्नमॅन ७०.०३ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १.९१ किलोमीटर पोहणे, ९१ किलोमीटर सायकलींग आणि २१ किलोमीटर धावणे असे प्रकार होते. हे तिन्ही प्रकार ८.३० तासांच्या कालावधीत पूर्ण करीत चंद्रपूरच्या इंडियन मेडीकल असोसिएशनशी संलग्नीत डॉक्टरांनी पुस्कारावर आपले नांव कोरले आहे. यामध्ये डॉ. संदिप मुनगंटीवार, डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. सचिन भेदे, डॉ. प्राजक्ता आस्वार, डॉ. गुरूराज कुलकर्णी, डॉ. नबा शिवजी, डॉ. रिजवान अली शिवजी, डॉ. अभय राठोड व पोलिस कर्मचारी श्रीपाद बल्की यांचा श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Doctor's success in Germany's Duisburg Ironman makes Chandrapur district proud: Sudhir Mungantiwar, successful doctor felicitated