चंद्रपुरातील रामसेतु देशातील सर्वांगसुंदर विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज, रामसेतू सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Ram Setu in Chandrapur is the third bridge in the country with beautiful electric lighting, Ram Setu will shine with beautiful and attractive electric lighting - Guardian Minister Sudhir Mungantiwar

🔸चंद्रपुरातील रामसेतु देशातील सर्वांगसुंदर विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज

🔸रामसेतू सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघणार - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 25 डिसम्बर : चंद्रपूर येथील दाताळा रोडवरील इरई नदीवर ब्रिज उभारण्याचे एक स्वप्न व संकल्प होता, ते पूर्णत्वास आले असून चंद्रपूरचा रामसेतू ब्रिज हा देशातील विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज असेल. सुंदर व आकर्षक अशा विद्युत रोषणाईने हा रामसेतू झळाळून निघणार आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

रामसेतू, दाताळा रोड, चंद्रपूर येथील विद्युत रोषणाई शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पुनम वर्मा, देवराव भोंगळे, राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर,राहुल पावडे आदी प्रामुख्याने उपथित होते.
रामसेतूवर सुंदर व आकर्षक अशा तीन कोटी रुपयाच्या विद्युत रोषणाई कामाचा शुभारंभ होत आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुंबईच्या सी-लिंक ब्रिजवरून जातांना वाटायचे की, चंद्रपूरमध्ये देखील असा देखणा ब्रिज व्हावा. मुंबईच्या धर्तीवर आणि पणजीमध्ये जो ब्रिज आहे तसाच हा रामसेतू होणार आहे. रामसेतू हा देशातील विद्युत रोषणाई असणारा तिसरा ब्रिज असेल, ज्याला सर्वांगसुंदर लायटिंग व म्युझिकची व्यवस्था असणार आहे. विद्युत रोषणाईसह हा रामसेतू पुढच्या 26 जानेवारीपर्यंत सर्व नागरीकांना बघण्यासाठी मिळेल. सुंदर ब्रिज व लायटिंग झाल्यानंतर रात्री लोक या ठिकाणी कुटुंबासह येतील तेव्हा सुंदर ब्रिज पाहून दिवसभरातील थकवा व कष्ट विसरून जातील, असा हा सर्वोत्तम ब्रिज होणार आहे.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून गणेश विसर्जन या नदीमध्ये करण्यात येत आहे, आता नव्याने दोन प्रकल्प हाती घेण्यात आले असून नदी परिसरात बाराही महिने पाणी असल्यास या ब्रिजची सुंदरता आणखी वाढेल. यासाठी जलसंधारण विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास जूनच्या पहिल्या पावसाच्या अगोदर या नदीवर बंधारा बाधंण्याचे काम पूर्णत्वास येईल. त्यासोबतच सुंदर घाट निर्मिती या ठिकाणी व्हावी यासाठी गणपती विसर्जनासाठी घाट बांधण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहे. देवी,गणेश विसर्जन तसेच इतर धार्मिक कार्यासाठी हा घाट निश्चितपणे उपयोगी पडेल, यासाठी घाट बांधण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 
पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे या भागात पुराचे पाणी शिरते, यावर देखील नियोजन करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापनाकडे संरक्षण भिंत उभारणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूरीनंतर या ठिकाणी संरक्षण भिंतीची उभारणी देखील करण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्रात उत्तम खेळाडू घडावेत यासाठी देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील आहे. उत्तम दर्जाच्या गुणवत्तेचा सिंथेटिक ट्रॅक महाराष्ट्रात फक्त तीन ठिकाणी आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळा, बल्लारपूर येथील स्टेडियम व जिल्हा क्रीडा संकुल ही तीन ठिकाणे आहेत. 
जुबली हायस्कूल, माता महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, तीर्थक्षेत्र मार्कंडा या ठिकाणी देखील विकास कामे करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 200 कोटीचे टाटा टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रात चंद्रपूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु झाले आहे. एमआयडीसीच्या 20 एकर क्षेत्रात भारत सरकारचे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट उभारण्यात येत आहे. या स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधून जिल्ह्यातील युवक उत्तम दर्जाचे स्किल घेऊन आकाशात उंच भरारी घेऊ शकेल. अमृत महोत्सवी वर्षात महिला पुढे जाव्यात म्हणून चंद्रपूर बल्लारपूरच्या मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 50 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. 250 कोटी रुपये खर्च करून मुलींना प्रशिक्षण व 43 स्किल शिकविणारे विद्यापीठाचे उपकेंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी पहिल्या टप्प्याचे 55 कोटी रुपये मंजूर केले. या उपकेंद्राचे बांधकाम पूर्णत्वास येईपर्यंत 10 प्रकारचे अभ्यासक्रम माहे जूनपासून सुरू करण्यात येत आहे.
हा चंद्रपुर जिल्हा विकासाच्या बाबतीत नेहमी अग्रेसर राहावा, यासाठी प्रयत्न केल्या जात असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Ram Setu in Chandrapur is the third bridge in the country with beautiful electric lighting

Ram Setu will shine with beautiful and attractive electric lighting - Guardian Minister Sudhir Mungantiwar