शासकीय कार्यालय सुरू राहणार
⭕ जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
चंद्रपूर, दि. 23 मार्च : जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी कर्मचा-यांनी केलेला आठ दिवसांचा संप, त्यानंतर 22 मार्च रोजीची गुडीपाडव्याची तसेच येणा-या 30 मार्च रोजी रामनवमीची शासकीय सुट्टी लक्षात घेता ‘मार्च एंडींग’ ची अर्थसंकल्पीय कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे शनिवार दि. 25 मार्च 2023 रोजी सुट्टीच्या दिवशी सर्व शासकीय कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.
शासनाकडून विविध विकासयोजना व लोकोपयोगी कामांकरीता निधी प्राप्त होत असतो. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी प्राप्त झालेला निधी 31 मार्चपर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. दरम्यान या महिन्यात जुनी पेंशन योजनेसाठी कर्मचा-यांनी 14 ते 20 मार्चपर्यंत संप पुकारला होता. 21 मार्च रोजी कार्यालय सुरळीत सुरू झाले. मात्र लगेच 22 मार्च रोजी गुडीपाडव्याची सुट्टी व येणा-या 30 मार्चला रामनवमीची शासकीय सुट्टी आहे. आधीच कर्मचा-यांच्या संपामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये एक आठवड्याचा खंड पडल्याने शासनाकडून विकास कामांकरिता प्राप्त झालेले अनुदान अखर्चित असून सामान्य जनता या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संपाच्या कालावधीत मागे पडलेले कामकाज तसेच शासनाकडून विविध विकासयोजना व लोकोपयोगी कामकाजाकरीता प्राप्त झालेल्या अनुदानाचे देयके कोषागार कार्यालयामध्ये मंजुरीला पाठविण्यासाठी शनिवार दि. 25 मार्च 2023 रोजी कार्यालय सुरू ठेवण्यात यावे. जिल्ह्याच्या विकासकामांकरीता आलेला शासनाचा निधी वेळेत खर्च होऊन समर्पित होणार नाही, व सामान्य जनता लाभापासून वंचित राहणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.
On the set of 'March Ending' this coming Saturday
Government offices will continue
⭕ Collector issued orders