मोठी बातमी: मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर, एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते? मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागला? अभिजात दर्जाने काय बदल होतात? Big news: Marathi language declared classical, how does a language become 'classical'? What was the struggle for Marathi to get elite status? What changes in class?

मोठी बातमी: मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर

एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?

मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागला?

अभिजात दर्जाने काय बदल होतात?

मुंबई, 03 ऑक्टोबर: मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दशकांपासून करत आली आहे. आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजाद दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे काय निकष आहेत?

भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.

• प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.

• दुसर्‍या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.

• 'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

भारतात आत्ताच्या घडीला 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता. तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलुगु (2008), मल्याळम (2013) आणि ओडिया (2014)

मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय संघर्ष करावा लागला?
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा संघर्ष हा आजचा नाही. मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 साली प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती. 2013 साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचं या अहवालात म्हटलं होतं.

अकरा कोटी लोकांची मराठी जगातली 10 व्या ते 15 व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजातपण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालात म्हटलं होतं.

अभिजात दर्जाने काय बदल होतात?
एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात? आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिलाय त्यांना यातले कोणते लाभ दिले गेले याबद्दल 2016 साली सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितलं होतं की संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांसाठी काही संस्था उभारल्या गेल्या आहेत. तसंच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली गेली होती. यात प्रत्येक भाषेसाठी दरवर्षी काही कोटी रुपये दिले गेले होते.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे भाषा संवर्धनासाठी काय फायदे सांगितले आहेत

मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणं
भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं
प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं
महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं
मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं
केंद्र सरकारने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की मराठीला आणि अन्य भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे नोकरीच्या संधीत वाढ होतील. विशेषत: सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर संवर्धन, माहिती गोळा करणं, या भाषांमधील पुरातन साहित्याचं डिजिटायझेशन यामुळे भाषांतर, नोंद, विविध साहित्याचं प्रकाशन तसंच डिजिटल माध्यमात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे महाराष्ट्र (मराठी), बिहार, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश (पाली आणि प्राकृत), पश्चिम बंगाल (बंगाली), आसाम (आसामी) या राज्यांवर या निर्णयाचा प्रभाव पडेल. मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या निर्णयाचा दूरगामी परिणाम होईल.
Big news: Marathi language declared classical, how does a language become 'classical'?  What was the struggle for Marathi to get elite status?   What changes in class?

#Big news  #Marathi-Language-Declared- classical  #Marathi-classical  #Marathi 
#Marathi-Abhijat