गोंडवाना विद्यापीठाने केलेला सन्मान चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी सहाय्यभूत ठरेल : मंत्री सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते डी. लिट. प्रदान
स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारा
चंद्रपूर/गडचिरोली, दि. 2 ऑक्टोबर : गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो, त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने खास आहे. या सन्मानामुळे मिळालेली प्रेरणा, ऊर्जा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी मला सहाय्यभूत ठरेल, असे भावनिक प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले.
या सन्मानमुळे माझ्या पित्याचे स्वप्न पितृमोक्ष अमावस्या दिनी आणि गांधी जयंती सारख्या विशेष दिनी साकार झाले याचा विशेष आनंद झाल्याचे सांगताना मंत्री मुनगंटीवार अत्यंत भावनिक झाले होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या ११आणि १२ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री. सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले; यावेळी ते बोलत होते. मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रकुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, रजिस्ट्रार डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य मंचावर उपस्थित होते.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले की, जुन्या आठवणींमुळे माझे भाव दाटून आले असून माझ्यासाठी हा क्षण बहुमूल्य आहे. माझ्या कुटुंबात बहुतेक डॉक्टर आहेत; वडील सुप्रसिद्ध डॉक्टर होते; मी देखील डॉक्टर व्हावं ही बाबांची इच्छा होती; बाबांना आणीबाणीच्या काळात 19 महिन्याचा कारावास झाला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. पण आज पितृमोक्ष अमावस्या या दिवशी माझ्या बाबांना ही पदवी समर्पित करताना आयुष्यातील एक अपूर्णता पूर्णतेमध्ये परावार्तीत झाल्याने भारावून गेलो आहे.
गडचिरोली, चंद्रपूर या दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने, आदिवासी संस्कृती आणि वैभवला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीसाठी मी संघर्ष केला, प्रयत्न केले त्याचे मला मनापासून समाधान आहे. सुंदर पर्यावरण, शुद्ध हवा, असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात हे विद्यापीठ स्थापन करता आले याचा आनंद आहे ; कारण जेथे शुद्ध विचार तेथे शुद्ध आचार आणि शुद्ध आचार असतील तेथे शुद्ध कृती होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचा नामविस्तार असेल किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार असेल या प्रत्येक अभियानात मी होतो हे मी माझे सौभाग्य समजतो. या सर्वं महामानवांच्या नावाने विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पदवी घेताना स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारला पाहिजे. शिक्षण घेतल्यावर समाजाला "हम आपके है कोन" बनण्याच्या ऐवजी "हम साथ साथ है" चा भाव त्याच्या हृदयामध्ये जन्माला आला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
गोंडवाना विद्यापीठाने दिलेली मानद डी. लिट. मला ऊर्जा देणारी आहे; लोकोपयोगी कार्यात मी स्वतःला झोकून दिले आहेच; परंतु अधिक वेगाने विकास कामे करण्याची शक्ती विद्यापीठाने मला प्रदान केली आहे. हे विद्यापीठ डॉ प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वात व व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मार्गदर्शनात उत्तम कामगिरी करत राहील, अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.
The honor given by Gondwana University will be helpful for the educational, social development of Chandrapur-Gadchiroli district: Minister Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar was awarded by the Governor. D. Lit. provided
#D.-Lit
#Sudhir-Mungantiwar
#D.-Lit-Sudhir-Mungantiwar
#Chandrapur-Gadchiroli
#Gondwana-University