आमदार सुधाकर अडबाले यांचे कंपनी व्यवस्थापनास निर्देश
कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक
चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) या कंपनीमध्ये १३ ऑक्टोंबर २०२४ रोजी अजय रवींद्र राम (रा. बिहार) या कामगाराचा २०० किलो स्टील स्क्रॅप अंगावर पडल्याने मृत्यू झाला होता. सदर कामगाराच्या कुटूंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्यवस्थापनाने मृतदेह त्याच्या मूळगावी पाठवून दिला. तसेच पाच महिन्यांपूर्वी याच कंपनीत श्यामसुंदर ठेंगणे या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्याला सुध्दा ठरल्याप्रमाणे पूर्ण मदत देण्यात आली नाही. याची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी सहायक कामगार आयुक्त यांच्या दालनात कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन दोन्ही मृत कामगारांच्या कुटूंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश दिले.
ओमॅट वेस्ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) कंपनीमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनेनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी दिसून आल्या. मृत्यू झालेल्या कामगारास तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व कंपनी व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर सहायक कामगार आयुक्त चंद्रपूर यांनी आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनासोबत बैठक लावली.
कंपनीतील मृत अजय रवींद्र राम या कामगारास आर्थिक मदत देण्याबाबत काय कार्यवाही केली, अशी विचारणा आमदार अडबाले यांनी केली. यावर सध्या २ लाख रूपये कामगाराचे वारसदाराला दिलेले असून उर्वरित नुकसानभरपाईची रक्कम नियमानुसार देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच जून महिन्यात सदर कंपनीत श्यामसुंदर ठेंगणे या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यास ४५ लक्ष वारसदारांना देण्यात येईल, असे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले होते. त्यातील ३० लक्ष देण्यात आले असून १५ लक्ष रुपये आतापर्यंत कंपनीने का दिले नाही, याची विचारणा केली. याबाबत उर्वरित रक्कम नियमानुसार देण्यात येईल, असे कंपनी व्यवस्थापकांनी सांगितले.
सोबतच सदर कंपनीचे स्ट्रक्चरल ऑडिट, कंपनीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, प्रदूषण नियंत्रणार्थ उपाययोजना, शेतपिकांचे होणारे नुकसान, परप्रांतीय कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन, कामगारांना नियमानुसार वेतन व इतर बाबींवर चर्चा करण्यात आली असून या सर्व बाबींची सविस्तर माहिती सहायक कामगार आयुुक्तांनी द्यावी, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी केल्या. तसेच याच विषयांवर जिल्हाधिकारी, फॅक्टरी निरीक्षक, सहायक कामगार आयुक्त यांच्यासोबत कंपनी व्यवस्थापनाची बैठक लावणार असल्याचे आमदार अडबाले यांनी सांगितले.
बैठकीला सहायक कामगार आयुक्त श्री. धुर्वे, ताडाळी उपसरपंच निखीलेश चामरे, प्रा. रवी झाडे व कंपनी अधिकारी उपस्थित होते.
Provide immediate financial assistance to the families of the deceased workers, MLA Sudhakar Adbale directed the company management, meeting with the company management
#Provideimmediatefinancialassistance #MLASudhakarAdbale #companymanagement